चांदूर बाजार : खरीप हंगामातील पिकाचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीवरसुद्धा वातावरणातील बदलांमुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज भासत असल्याची चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे परिसरातील सोयाबीन, मूग, उडीद तसेच बोंडअळीमुळे कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच भागांतील सोयाबीन, उडीद, मूग पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. तूर पिकावरसुद्धा वातावरणातील बदलामुळे शेंगा पोखरणारी अळीचे मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे.
सध्या तूर पिकाला फुले, शेंगांचा चांगलाच बहर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवस ढगाळलेल्या वातावरणातील बदलांमुळे या पिकावर, शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केले. यामुळे तूर पिकाचे भविष्यसुद्धा धोक्यात येत असल्याचे स्पष्ट रूप दिसून येत आहे. आजपर्यंत डोलदार दिसणारे तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाते की काय, अशी परिस्थिती या शेंगा पोखरणाऱ्या अळीने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे. त्यामुळे या परिसरातील तूर पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सोयाबीन, कपाशी, मूग पिकाचे झालेल्या नुकसानापासून शेतकरी सावरला नसताना, पिकाच्या नुकसानाच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना तूर पिकावर आलेल्या शेंगा पोखरणाऱ्या पाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज भासू लागली आहे.
--------------------
तूर पिकावर पाने गुंडळणारी व शेंगा पोखणाऱ्याला अळीचा प्रादुर्भाव होत आहे. हे आर्थिक नुकसान पातळीच्या आत दिसून येत असून, त्यावर क्षेत्रिया कर्मचाऱ्यांमार्फत उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे सुरू आहे. शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबोळी अर्काची तसेच अझाडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिलिची फवारणी तुरीवर करावी.
- अंकुश जोगदंड, तालुका कूषी अधिकारी