महाराष्ट्रात विदर्भ सामील केल्यानंतर ७० वर्षांपासून सर्वच क्षेत्रात विदर्भावर सतत अन्याय केला जात आहे. खोटी आश्वासने देऊन विदर्भाची लूट चालवली आहे. म्हणून आम्हाला आता वेगळे विदर्भ राज्य हवे आहे, ते आम्ही मिळवणारच. वीज विदर्भात तयार होऊनसुद्धा सर्वात जास्त महागडी व निकृष्ट वीज विदर्भाला देण्यात येते व भारनियमन लादले जाते.
कोरोनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र याउलट वीजबिलात वाढ केली. थकीत वीज ग्राहकांची वीज कापणे सक्तीने सुरू केली. हा विदर्भातील जनतेवर केलेला अन्याय असून, आता महाराष्टातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही, असे भाषण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधाव गावंडे यांनी रास्तारोको आंदोलनात केले. पेट्रोल, डिझेलची दिवसेंदिवस दरवाढ होत आहे. ती कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. २०२० च्या पीक हंगामात सोयाबीन व कपाशीचे पीक पूर्ण बुडाले. शेतकऱ्यांनी त्या पिकांचा विमा भरूनसुद्धा आजपर्यंत त्या पिकाची नुकसानभरपाई मिळाली नाही. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते पण वन्यप्राणी असलेला सर्पदंशाने बळी गेला तर संबंधितांना नुकसानभरपाई मिळत नाही.
विदर्भातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व न्याय्य हक्कासाठी वेगळा विदर्भ हवेच, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता रस्त्यावर उतरले पाहिजे. त्याशिवाय शासनापर्यंत तुमचा आवाज पोहचणार नाही, असे शेतकरी संघटनेचे आंदोलक माणिकराव मोरे यांनी सांगितले. यावेळी संजय हाडोळे, गजानन पा.दुधाट, सुनील साबळे, जिल्हा उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती मनोहर रेचे, ग्रामगीताचार्य, ह.भ.प. सुरेश महाराज मानकर शास्त्री, देविदास ढोक, अशोक गीते, किशोर काळमेघ, मोहन ठाकरे, युवा आघाडी, संजय हिंगे, विलास धुमाळे, अरूण गोंडचोर, ओमप्रकाश मुरतकर, प्रभाकर अन्ना गावणेर, भाऊराव साबळे, ज्ञानेश्वर वानखडे, गणेशराव चिंचोळकर आदी उपस्थित होते. वाहतुकीला अडथडा होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.