पान ३ साठी लिड
परतवाडा : अमरावती विभागातील वन व वन्यजीव विभागातील वनअधिकाऱ्यांच्या गाड्यांवर आजही अंबर दिवा लुकलुकत आहे. यातील काहींच्या गाड्यांवरील हा दिवा झाकून ठेवण्यात आला, काही मात्र कव्हर काढून तो दिवा येथेच्छ वापरत आहेत.
केंद्र शासनाच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचना एसओ ३७४ (ई) दि. १ मे २०१७ अन्वये वनअधिकाऱ्यांना दिलेल्या शासकीय वाहनाच्या टपावर अंबर दिवा लावणे अनुज्ञेय नाही. अंबर दिवा अनुज्ञेय नसल्यामुळे तो काढून टाकणे अपेक्षित असताना अमरावती वनविभागातील वनअधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष चालवले आहे.
केंद्र शासनाच्या २०१७ च्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र शासनाचे ७ नोव्हेंबर २०१६ चे राजपत्र पुढे करून वनअधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभागाच्या गाड्यांवरील अंबर दिव्याचे समर्थन करीत आहेत. अंमलबजावणीच्या कर्तव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनावर फिरता अंबर दिवा अनुज्ञेय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात हौशी वनअधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात फिरता अंबर दिवा ठेवत आहेत. मेळघाटातही वनविभागाच्या काही वाहनांवर अंबर दिवा लुकलुकताना दिसतो. बरेचदा हा अंबर दिवा त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरही लुकलुकतो.
खरे तर केंद्र शासनाच्या २०१७ च्या अधिसूचनेनंतर राज्यात जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांपासून राजस्व विभागातील अधिकाऱ्यांसह प्रशासनातील शासकीय वाहनांवरील अंबर दिवा काढण्यात आला. ते अंबर दिवा वापर नाहीत. मात्र, वनअधिकाऱ्यांच्या गाड्यांवर तो अंबर दिवा आजही आहे.
दरम्यान, बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी १८ डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये वनअधिकाऱ्यांच्या गाड्यांवर अंबर दिवा अनुज्ञेय नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एमएच ४२ बी ६९६० क्रमांकाच्या वाहनावर अंबर दिवा कायम ठेवल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना १८ डिसेंबर २०२० चा पत्रप्रपंच करावा लागला. यातूनच वन विभागातील हे अंबर दिवे चर्चेत आले आहेत.
अमरावती विभागातील एक-दोन अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीवरील दिवा काढून घेतला असला तरी काहींनी तो आपल्या वाहनावर आजही कायम ठेवला आहे.
कोट
महाराष्ट्र शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१६ च्या राजपत्रान्वये वनविभागाला अंबर दिवा अनुज्ञेय आहे.
- हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, ढाकणा.