गजानन मोहोड
अमरावती : कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अधिकतर केंद्र बंद राहत आहेत. अशा स्थितीत तीन टक्के डोस वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३०.०६ लाख डोस प्राप्त झाले. यातील कोविशिल्डचे ३.५७ टक्के, तर कोव्हॅक्सिनचे १.९८ टक्के डोस वाया गेल्याचा आरोग्य यंत्रणेचा अहवाल आहे.
लसीकरण केंद्रांवर शेवटचे चार, पाच लाभार्थी असले तरी त्यांना लस द्यावीच लागते. त्यामुळे व्हायलमधील शेवटचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही २.७७ टक्के असल्याचे दिसून येते. ज्या दिवशीचे व्हायल त्याच दिवसी वापरावे लागत असल्याने काही डोस रोज वाया जात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
विभागात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ३०,०५,९२० डोस प्राप्त झाले. यात कोविशिल्ड २३,०७,३५०, तर कोव्हॅक्सिनचे ६,९८,५७० डोस आहेत. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ४,८६,४००, अमरावती ७,२२,४४०, बुलडाणा ६,८८,२२०, वाशिम ४,२०,७४० व यवतमाळ जिल्ह्यात ६,८८,१२० डोस प्राप्त झाले आहेत.बुधवारपर्यंत २८,९५,८२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने आठवड्यातील दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुस्की आरोग्य विभागावर ओढवली आहे.
बॉक्स
चार तासांत वापरावे लागते व्हाॅयल
लसीकरणासाठी व्हायल उघडल्यानंतर ती चार तासांच्या आत वापरावी लागते, अन्यथा वाया जाते. लसीचा साठा आयलरमध्ये ठेवल्या जातो. केंद्रांत लस ही व्हॅक्सिन कॅरिअरमध्ये ठेवली जाते. यात चार आईस पॅक असतात. यापैकी तीन आतमध्ये व एक बाहेर असतो. यासाठी कंडीशनर आईस पॅक वापरला जातो. दोन ते आठ अंश तापमानात लस ठेवली जाते.
बॉक्स
जिल्हानिहाय वाया गेलेले डोस (टक्के)
जिल्हा कोविशिल्ड कोव्हॅक्सिन
अकोला ३.२८ १.२३
अमरावती ७.२९ ०.३६
बुलडाणा २.७५ २.९३
वाशिम १.०२ २.६४
यवतमाळ ३.५२ २.६९
कोट
लसीकरणात प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थीला लस द्यावी लागते. अशावेळी शेवटच्या व्हायलमधील काही डोस वाया जातात. चार तासांपर्यंतच डोस वापरता येतो.
- डॉ दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी