परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील घराघरांत विराजमान गणेशमूर्ती गोळा करून त्याचे विसर्जन अचलपूर नगरपालिका करणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून एका व्हाॅट्सॲप मेसेजद्वारे प्रसारित करण्यात आले आहे.
अनेक गणेशभक्तांनी मात्र याबाबत वैयक्तिक पातळीवर नाराजी व्यक्त केली. मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली. यामुळे आमच्या गणपती बाप्पाला आम्ही निरोप देणार, असे मत अनेक गणेशभक्तांनी व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या दालनात यानिमित्त १८ सप्टेंबरला प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि संबंधित ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विसर्जनस्थळी गणेशभक्तांनी आपल्याकडील मूर्ती प्रशासकीय यंत्रणेकडे सुपूर्द करावी आणि नंतर गोळा झालेल्या या मूर्तीही प्रशासकीय यंत्रणा विसर्जित करेल, असा निर्णय घेतला गेला. सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी गणेश विसर्जन केले जावे. विसर्जनस्थळी भाविकांनी गर्दी करू नये. कोविडच्या अनुषंगाने नियमावली पाळावी, असेही निश्चित केले गेले.
गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील व्यवस्था गटविकास अधिकाऱ्यांकडे, तर शहरी भागातील व्यवस्था नगर परिषदेकडे देण्यात आली आहे. विसर्जनाच्या अनुषंगाने अंबाडा, सावळी, गोंडविहीर ही स्थळे संवेदनशील घोषित केली गेली आहेत.
-----------
गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने उपविभागातील प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेण्यात आली. यात प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी भक्तानी गर्दी करू नये. सायंकाळी ६ पूर्वी विसर्जन पार पाडावे.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, अचलपूर.
---------
ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना गावपातळीवर दवंडीद्वारे देण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळी गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येईल. विसर्जन स्थळी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेकडे ती गणेश मूर्ती विसर्जनाकरिता गणेशभक्तांनी सोपविणे यात अपेक्षित आहे.
- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी
-----------------
घरगुती गणेशमूर्तीं गोळा करणे वेळेवर शक्य होणार नाही. विसर्जन स्थळी नगरपालिकेकडून व्यवस्था केली जाईल. जे भक्त विसर्जनाकरिता आपल्याकडील गणेशमूर्ती आमच्याकडे सुपूर्द करतील, त्या मूर्तींचे आम्ही विसर्जन करू. विसर्जनस्थळी गणेशभक्त गर्दी करणार नाहीत, याकडे लक्ष दिले जाईल.
- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी