धारणी : पतीसोबत इव्हीनिंग वॉक करणाऱ्या नवविवाहितेचे धारणीच्या चिखलपाठ रस्त्यावर रात्री १० वाजता अपहरण करणारा दुसरा कोणीच नसून तो तिचा प्रियकर असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. धारणी पोलिसांनी नवविवाहितेसह आरोपी बुरहान अन्वर हुसेन याला मध्यप्रदेशातील उनेन गावातून अटक केली. धारणी येथील एक महिला रात्री १० वाजता जेवण करून पतीसोबत इव्हीनिंग वॉकसाठी तलई रस्त्यावरील चिखलपाठ गावाकडे जात होते. त्याच क्षणी बुरहान अनवर हुसेन (२५, रा. रतलाम, मध्यप्रदेश) हा बोलेरो गाडी घेऊन आला. पतीला मारहाण करून त्यांच्या पत्नीला गाडीत सोबत घेऊन अपहरण करून बऱ्हाणपूर येथे नेले. तेथून नवविवाहितेला उज्जैनजवळील उनेन गावात नातेवाईकांकडे नेले. अपहरणामुळे पोलिसांची दमछाकअपहरणाची माहिती धारणी पोलिसांना कळताच एपीआय एस. के. चव्हाण यांच्या पथकाने आरोपी नातेवाईकाचे घरी धाड टाकून बुरहान हुसैनला अटक केली. त्यांना धारणीत शनिवारी रात्रीपर्यंत आणणार असल्याची माहिती एपीआय चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली. ३१ जुलै रोजी नवविवाहितेचे अपहरण धारणीमधून होताच जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी धारणी-परतवाडा मार्ग, धारणी-अकोट मार्ग, धारणी-बऱ्हाणपूर मार्गावर रात्रीच एल. सी. बी. स्कॉड व आर. सी. एफ. जवान पाठवून नाकाबंदी केली. मात्र नाकाबंदीला झुगारून आरोपी प्रेमीने प्रेमिकेला मोठ्या शिताफीने पळवून नेले हे विशेष.
धारणीत नवविवाहितेचे अपहरण; आरोपीस अटक
By admin | Updated: August 2, 2014 23:51 IST