चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रोड हा अनेक वर्षापासून अतिशय खराब झाला असून सदर रस्ता जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावर अनेक अपघातसुद्धा झाले आहे. मात्र, बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याचे एक महिन्यात काम सुरू न झाल्यास गुढी पाडव्याला बांधकाम विभागाचे कार्यालय बेशरमच्या पाना - फुलांनी सजविण्याचा इशारा आम आदमी पार्टीतर्फे देण्यात आला होता. यानंतर बांधकाम विभागाने धसका घेत ८ एप्रिलपासून या रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला सुरूवात केली. सदर विभागाकडून विनंतीचे लेखी पत्र प्राप्त झाल्यामुळे आम आदमी पार्टीने आंदोलन मागे घेतले. परंतु २ - ४ दिवस काम करून पुन्हा बंद झाले व अद्यापही सुरू झालेले नाही. पुढे पावसाळा आहे व पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम व्यवस्थित होत नाही किंवा डांबरीकरण करणे चुकीचे होते. पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू काम बंद पडण्याचे एकमेव उदाहरण कुऱ्हा रस्त्याबाबत आहे. सुरू झालेले काम का बंद झाले, त्याची सर्वसामान्यांत वेगवेगळी चर्चा आहे. ३१ मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंता पी. वाय. गुडधे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मेहमूद हुसेन, चरण जोल्हे, पंकज गुडधे यांचा सहभाग होता.
बांधकाम विभागात आम आदमी पार्टीचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST