प्रदीप भाकरे, अमरावती: शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरात रविवारी रात्री एका डमी अश्रूधूर नळकांडीमुळे मोठी खळबळ उडाली. नळकांडीतून निघणाऱ्या धुरामुळे घरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. तर रस्त्याने जाणाऱ्यांच्या डोळ्यांत आग होऊ लागल्याने सर्वत्र धावपळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी एसआरपीएफच्या व्हॉलिबॉल मैदानावर गेला होता. तिथे त्याला एक डमी अश्रूधूर नळकांडी सापडली. कुतूहलापोटी त्याने ती नळकांडी घरी आणून फोडली. नळकांडी फुटताच त्यातून प्रचंड धूर बाहेर पडला, ज्यामुळे स्थानिक रहिवासी सैरावैरा पळू लागले.
घटनेची माहिती मिळताच एसीपी कैलास पुंडकर आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन शिरसाट ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खबरदारी म्हणून एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र चौकशीअंती त्याला सोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती.
फ्रेजरपुरा मशीद परिसरातील एका पंधरा वर्षीय मुलाने कुतूहलापोटी ते नळकांडी घरी आणली. रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास त्या नळकांड्यासोबत खेळत असताना त्यातून धूर निघाला, मात्र कुठलीही हानी झाली नाही, असे फ्रेझरपुराचे ठाणेदार रोशन शिरसाट यांनी लोकमतला सांगितले.
Web Summary : A dummy tear gas shell exploded in Amravati's Rahul Nagar, causing panic. A minor found the shell and brought it home, triggering smoke and chaos. Police investigated, finding no harm occurred.
Web Summary : अमरावती के राहुल नगर में एक डमी आंसू गैस का गोला फटने से दहशत फैल गई। एक नाबालिग को गोला मिला और वह उसे घर ले आया, जिससे धुंआ और अराजकता फैल गई। पुलिस ने जांच की, कोई नुकसान नहीं हुआ।