अमरावती : ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमचं गाव आमचा विकास हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यानुसार ग्रामपंचायतीत सन २०२२-२३ चा जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायत आराखडा तयार करण्यात येणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगाव्दारे ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषावर मोठा निधी प्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार केल्या मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतींना त्यांच्या स्वउत्पन्नाच्या बाबीशिवाय वित्त आयाेगांतर्गत मोठ्या प्रमाणावर बंधित व मुक्त निधी प्राप्त होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत निधीच्या नियोजनांचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यामुळे ग्रामस्तरावर लोकसहभागातून गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे विकास आराखडे तयार केले जाणार आहेत. आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना याबाबत केंद्र शासनाने सूचित केलेल्या बाबी, १५ व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीविषयी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचना आणि पूरक मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन २०२२-२३ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा अंतिम केला जाणार आहे.
बॉक्स
वार्षिक आराखडे ऑनलॉईन
सन २०२२-२३ या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा निश्चित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा २ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येतील. प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांचे वेळापत्रक निश्चित करपण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे वार्षिक आराखडे तयार करून ते ई- ग्रामस्वराज या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे.