अमरावती : जिल्ह्यात तापाची साथ पसरली असून एकट्या जुलै महिन्यात ४५ हजार ४४० तापाचे रुग्ण आढळले आहेत. यातील हिवतापाचे ४८ रुग्ण असल्याचे तपासणी अंती स्पष्ट झाले. तसेच चांदूररेल्वे तालुक्यातील दोन गावे डेंग्यू तापाचा उद्रेक म्हणून जिल्हा हिवताप विभागाने घोषित केली आहेत.वातावरणातील बदल, अस्वच्छता, पाऊस व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात ताप आजाराची साथ सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व महापालिकेच्या हद्यीत जुलै महिन्यात एकूण ४५ हजार ४४० तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील हिवतापाच्या संशयित रुग्णांची तपासणी जिल्हा हिवताप विभागाने केली असता यातील ४८ रुग्ण हे हिवतापाने त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मे ते जुलै महिन्यापर्यंत डेंग्यूचे ११२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची रक्त तपासणी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली असून यातील १५ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण चांदूररेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर व टेंभूर्णी गावात आढळून आले. या गावांमध्ये दहा दिवस नियमीत सर्व्हेक्षण, गोळ्या वाटप, ग्रामसभा व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे हिवताप विभागाचे म्हणणे आहे.
महिनाभरात तापाचे ४५ हजार रुग्ण
By admin | Updated: August 6, 2014 23:35 IST