अंजनगाव बारी : सतत तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव बारी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेताचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अंजनगांव बारी परिसरातील २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण पीक खरडून गेले. उगवलेले सोयाबीन व कपासीचे पीक नष्ट झाले. अंजनगाव बारीत थड्डीपटा, गोविंदपूर, उतखेडा, वळगांव झिरे, निंभोरा, लाटे, खिरसाना, निरसाना, पाडुळातील चंदापूर भागातील पीक खरडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. भिवापूर तलाव भरल्यामुळे तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. कोंडेश्वर तलाव ७० टक्के भरला आहे. गरभपीर तलाव ६० टक्के भरले असून अडगाव तलाव ९० टक्के भरला आहे. भिवापूर तलाव १०० टक्के भरला आहे. सावंगा तलाव ९५ टक्के भरला आहे. संपूर्ण पाटबंधारे तुडूंब भरले आहेत. विहिरींची पातळी वाढली असून शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी साचल्याने सोयाबीन सडले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे. जवळपास अंजनगांव बारी परिसरातील १० लाख रुपयाच्या वर नुकसान झाले असून संत्रा, मोसंबी, निंबू इत्यादी फलोत्पादनाची वादळी पावसामुुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका फळभाज्या पालक, सांबार, वांगी, टमाटर मिरची कारली या पिकांनाही बसला आहे. संत्राच्या आंबिया बार संपूर्ण गळून पडला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोेठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. यंदा येथील शेतकऱ्यांनी उसनवार करुन शेतात महागडे बियाणे पेरले. परंतु पहिल्याच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. घरे पडल्याची पाहणी करणाऱ्या पथकामध्ये सरपंच लक्ष्मणराव कदम, पंचायत समिती सदस्य भास्कर गभणे, ग्राम विकास अधिकारी पातालिया वगळता तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
अंजनगाव बारी परिसरात २०० हेक्टर शेतीचे नुकसान
By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST