बालिका दगावली : आरोग्य विभागाची चमू दाखल राजेश मालवीय धारणीनजीकच्या खापरखेडा येथे डायरियाने थैमान घातले असून आतापर्यंत २०० पेक्षा अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यापैकी ५० रुग्ण गंभीर असून पाच वर्षीय आदिवासी चिमुकली गॅस्ट्रोने दगावली. डायरियाचे गांभीर्य बघता जि.प. आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली आहे. येथील जि.प. शाळेत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून पााणी शुध्दीकरणासाठी मुदतबाह्य औषधींचे वाटप केल्याने ही साथ बळावल्याचा आरोप होत आहे.खापरखेड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर न टाकल्याने तीन दिवसांपासून गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसचिव मावसकर आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कळविले. मात्र, त्यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने गावात डायरियाचा प्रकोप वाढतच गेला. उलट्या-हागवणीच्या रुग्णांची संख्या वाढल्याने गावातील डॉक्टर ठाकूर यांनी याबाबत तत्काळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली. तत्काळ गावात आरोग्य चमू पाठवून रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. गंभीर रुग्णांना जवळच्या साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच कळमखार येथे आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
२०० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण
By admin | Updated: September 20, 2014 01:16 IST