वृत्त विश्लेषण
राजेश शेगाेकार
अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात शिवसेनेेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलेच ताेंडसुख घेतले. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता कायदेशीर बाजू तपासून भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यभरात चांगलेच राजकारण तापले असून, शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे आमदार झाल्यापासून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात संख्येने मजबूत असलेल्या भाजपाला थेट शिंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा नियाेजन समितीमधील निधीची फिरवाफिरव असाे की महानगरपालिकेतील भाजपाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपल्या शिलेदारांना दिलेले पाठबळ असाे. आ. देशमुखांनी भाजपाला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. त्यांच्या हा आक्रमकपणा मंगळवारी सेनेने काढलेल्या माेर्चातही चांगलाच समाेर आला. त्यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत ताेंडसुख घेतले. राणे यांच्या उंचीपासून तर थेट त्यांना प्राण्याची उपमा देण्यापर्यंत ते आक्रमक हाेते. आंदाेलनात त्यांनी काढलेले अनुद्गार आता चांगलेच व्हायरल झाले आहे. एकीकडे राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यावरून थेट अटक करून कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे शिवसेनेने प्रथम दर्शनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आता इतर पक्षांसाठी हाच मार्ग खुला झाला आहे. बुधवारी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतच छेडले असता त्यांनी सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे स्पष्ट केल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर यांची जबाबदारी वाढली आहे. आ. सावरकर हे सध्या अकाेल्यातील भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काेणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाेबत थेट भिडतात. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा सेनेच्या बाबतीत कितपत प्रखर हाेताे, यावर पुढचे राजकारण रंगणार आहे. राजकारणात टीका करताना अनेकांचा ताेल सुटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा वक्तव्याबाबत थेट अटकेची कारवाई करण्याची सुरुवात सेनेने केली असल्याचे विधान भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून प्रसारित हाेत आहे. त्यामुळे सेनेच्या कारवाईचा हिशेब अकाेल्यात चुकता करण्याची संधी भाजपा घेईल का? हा प्रश्न या निमित्ताने समाेर आला आहे.
युतीची शक्यता धूसरच
गेल्या विधानसभा निवडणुकी भाजप शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवत अकाेल्यात शतप्रतिशत यश मिळविले. पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाने तर एक शिवसेनेने जिंकला. युतीची एकत्रित मते विभाजित न झाल्याचा फायदा भाजप, सेना या दाेन्ही पक्षांना झाला. मात्र, महाविकास आघाडीच्या निमित्ताने या दाेन पक्षांतील मतभेद वाढतच गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती हाेईल, असे वाटत हाेते. राणे प्रकरणानंतर आता सेना-भाजपातील दरी आणखी रुंदावली असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याची संधी दाेन्ही पक्ष साेडणार नाहीत. त्यामुळे युतीची शक्यता आता धूसरच असल्याची चर्चा आहे.