अकोला: शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या योजनेला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मंजुरी दिली. शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी योजनेच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात मूलभूत सोयी-सुविधांसाठी मनपाला २८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यामधून ११ कोटी ८४ लाखांचा निधी पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या सुधारणेसाठी वळता करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला. तरतूद केलेल्या निधीतून ठोस कामे करण्यासाठी तांत्रिक सल्लागारची नियुक्ती करण्यात आली होती. पाणीपुरवठय़ाचे नियोजन लक्षात घेता, मनपाच्या जलप्रदाय विभागाने प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव आयुक्त अजय लहाने यांनी १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे सादर केला. यादरम्यान, अचानक विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर अकोल्यात दाखल झाले असता, जिल्हाधिकार्यांनी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांसमोर सादर केला. या विषयावर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी ११ कोटी ८४ लाखांच्या योजनेला मंजुरी दिली.
१२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला हिरवी झेंडी
By admin | Updated: November 21, 2015 01:53 IST