मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील ५०० हून अधिक गावांत जलसंधारणाचे काम करीत आलेल्या जलजागृती अभियानाचे अनुभव सांगताना गोमारे यांनी ‘मोर क्रॉप वर ड्रॉप’, शेतीचे ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल्स, नदी पुनरुज्जीवन, लोकसहभागातून कायमस्वरूपी टँकरमुक्ती या संकल्पना अत्यंत कमी पाण्यात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यास आणि सामान्य नागरिकांसाठी कशा उपयुक्त आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गिरीश पंचभाई यांनी प्रास्ताविक मांडताना व्याख्यात्याचा परिचय करून देत संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
डॉ. आहेर यांनी आपल्या भाषणात पाण्याचे पशुसंवर्धनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले, तर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भिकाने यांनी ‘चला करू या जलसंवर्धन, बनवू सुंदर अपुले जीवन’ या घोषवाक्यासह ग्रामीण, तसेच शहरी भागात सामान्य नागरिकांनी, पशुपालकांनी जलसंवर्धन कसे करावे, हे नमूद केले. सदर ऑनलाइन व्याख्यानाचा महाराष्ट्रातील सुमारे ९० अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेश इंगवले यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले.