तेल्हारा: खरेदी बंद झाल्याने ९८६ शेतकऱ्यांची तूर मोजमापांच्या प्रतीक्षेत पडून आहे. आता या तुरीचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आतापर्यंत नाफेडने अंदाजे २८ हजार क्विंटल तूर खरेदी केली. यामध्ये २,१३५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. त्यापैकी १,१४९ शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्यात आले व शासनाने तूर मोजमाप बंद केल्याने सध्या मार्केट यार्डमध्ये अंदाजे १४ हजार क्विंटल तूर पडून असून, ९८६ शेतकऱ्यांची तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहे. तेल्हारा मार्केट यार्डमध्ये ४० टक्के तूर पडून आहे व शेतकऱ्यांच्या घरीही तूर तशीच आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अन्यथा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी तेल्हारा तहसीलसमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन बेलखेड येथील ७३ वर्षीय शेतकरी दयाराम सीताराम वानखडे यांनी दिले आहे.१५ एप्रिलच्या नंतर येणाऱ्या तुरीचे शासनाने मोजमाप करून घ्यावे, अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी मोजमाप न झालेली तूर तेल्हारा तहसीलवर नेऊन आंदोलन करू.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरीचा शेवटचा दाणा विकत घेउ,असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण न केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देउ.- श्यामशील भोपळे, विरोधी पक्षनेता, बाजार समिती तेल्हारा
तेल्हारा येथे ९८६ शेतकऱ्यांची तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: April 25, 2017 01:21 IST