अकोला : वर्हाडी लोकसाहित्याचे महत्त्व खूप मोठे आहे. हे लोकधन काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याचे जतन होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊनच अकोल्यातील काळे बंधूंनी वर्हाडी लोकसाहित्याला संगणकाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचा ध्यास घेतला आहे. लवकरच हे वर्हाडी धन संगणकावर उपलब्ध होणार आहे. वर्हाडी बोली मराठीच्या आरंभ काळापासून अस्तित्वात आहे. मराठी भाषेत वर्हाडीने आपले वेगळेपण सातत्याने जपले आहे. काळाच्या प्रवाहात वर्हाडी बोली लुप्त होऊ नये आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी अकोल्यातील डॉ. रावसाहेब काळे व मनोज काळे या बंधूंनी ध्यास घेतला आहे. वर्हाडी बोलीचा प्रदेश, वर्हाडी बोली, वर्हाडी बोलीतील लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे, कोडे आदींचा अंतर्भाव संगणकावर होणार आहे. डॉ. रावसाहेब काळे हे वर्हाडी भाषेचे अभ्यासक आहेत. त्यांनी वर्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास करून त्यावर आचार्य पदवी संपादन केली आहे. ह्यभाषा आणि जीवनह्ण सारख्या मासिकात त्यांचे वर्हाडी बोलीवर विविध लेख प्रकाशित झाले आहेत. वर्हाडी बोलीचा शब्दकोश, वर्हाडी बोलीचा म्हणी कोश आणि वर्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोश तयार करण्यासाठी ते डॉ. विठ्ठल वाघ यांच्यासोबत सहाय्यक संशोधक म्हणून कार्य करीत आहेत. रावसाहेब काळे यांचे बंधु मनोज काळे हे आयटी इंजिनिअर आहेत. या दोघांनी एकत्र येऊन वर्हाडी बोलीला संगणकावर आणण्यासाठी काम सुरू केले आहे. लवकरच वर्हाडी भाषेची संपूर्ण माहिती वाचकांना संगणकावर उपलब्ध होणार असून या माध्यमातून वर्हाडी भाषा जगभर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. या माध्यमातून भाषेचे देखील जतन करता येणार आहे.
वर्हाडी लोकसाहित्य आता संगणकावर
By admin | Updated: June 1, 2014 01:13 IST