अकोला - सेवाभावी संस्थेमार्फत गरिबांसाठी चालविण्यात येत असलेल्या संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमार्फत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांचे सुमारे ५0 लाख रुपयांचे देयक अदा करण्यास शासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने आरोग्य मंत्र्यांकडे वारंवार मागणी केली असता, त्यांनी विधिमंडळात सदर रक्कम देण्याचे आश्वासन दिले; मात्र मागील दोन वर्षांंपासून ही रक्कम अद्यापही अदा करण्यात आली नाही. त्यामुळे गरीब रुग्णांवर उपचार करण्याचा गंभीर प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल सेवाभावी संस्थेद्वारा चालविण्यात येत आहे. या रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून प्रत्येक दिवशी तब्बल ५0 ते ६0 कर्करुग्णांवर उपचार करण्यात येतात. यासाठी लागणारे औषध खासगी औषध दुकानांमधून घेण्यात येत असून, त्यांच्या औषधांचे देयके ही त्याचवेळी अदा करावी लागतात. गरीब रुग्णांवर जीवनदायी योजनेतून उपचार करण्यासाठी औषध दुकानांमधून लाखो रुपयांची औषध विकत घेण्यात आली असून, संत तुकाराम हॉस्पिटल प्रशासनाने कर्ज काढून ही देयके अदा केली आहेत. त्यामुळे आता या रकमेवर व्याजही सुरू असून, रुग्णालयामध्ये येणार्या रुग्णांची संख्याही दिवसें-दिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाकडे थकीत असलेले सुमारे ४९ लाख ८५ हजार ४२७ रुपयांची देयके तत्काळ अदा करण्यात यावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. यासाठी त्यांनी आरोग्य उपसंचालक, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडेही मागणी केली आहे. आरोग्य मंत्री शेट्टी यांनी ९ जून २0१४ रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये संत तुकाराम हॉस्पिटलच्या थकबाकीची रक्कम देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ही रक्कम तातडीने देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर केवळ १0 लाख ९९ हजार ८१२ रुपये अदा करण्यात आले असून, ४९ लाख ८५ हजार ४२७ रुपयांची देयके अद्यापही थकीत आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांवर उपचार करण्यास संत तुकाराम हॉस्पिटल प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. रुग्णावर अन्याय होऊ नये किंवा एखाद्या रुग्णावर उपचार करण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी शासनाने ही थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. यावर संत तुकाराम हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांनी संत तुकाराम हॉस्पिटल प्रशासन सेवाभावी संस्थेमार्फत चालविण्यात येत असून, या ठिकाणी रोज आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या ७0 ते ८0 कर्करुग्णांवर उपचार करण्यात येतात. त्यासाठी जीवनदायी योजनेचा लाभ काही रुग्णांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येते. मात्र या रुग्णांवर उपचार करण्याचा खर्च आधी रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येतो. त्यानंतर ही देयके मिळतात; मात्र मागील दोन वर्षांपासून ही देयके मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे आता जिकरीचे होत आहे. त्यासाठी शासनाने ही रक्कम अदा करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगीतले.
अकोल्यातील तुकाराम हॉस्पिटलचे जीवनदायी योजनेचे शासनाकडे ५0 लाख थकीत
By admin | Updated: August 14, 2014 02:05 IST