अकोला : कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याने हाफकीनचा औषध पुरवठा बंद करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात महिनाभर पुरणार एवढाच औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी तीन महिने सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोट्यवधी प्रलंबित देयके मंजूर करण्याबाबत राज्य सरकारच्या खरेदी व विक्री कक्षाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी राज्यातील १०० पेक्षा जास्त औषध वितरकांनी सरकारला होणारे औषध वितरण थांबविले आहे. तसेच नवीन टेंडर प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता असून, त्याची झळ अकोल्यातील शासकीय रुग्णालयांनाही बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात सध्या एक महिना पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध आहे. दुसरीकडे २०२०-२१ वर्षातर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे फेब्रुवारी महिन्यातच हाफकीनकडे औषधांची मागणी केली आहे. मात्र, या मागणीतील कुठल्याच औषधांचा पुरवठा अद्याप झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महिनाभरात औषध पुरवठा न झाल्यास आगामी तीन महिन्यांत जीएमसीमध्ये औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१९-२० मधील केवळ ५० टक्के पुरवठा
सूत्रांच्या माहितीनुसार, जीएमसीकडून २०१९-२० या वर्षात हाफकीनकडे केलेल्या मागणीपैकी केवळ ५० टक्के औषध पुरवठा झाला आहे, तर चालू वर्षातील मागणीचा पुरवठाच झाला नसल्याची माहिती आहे.
जीएमसीकडून देयकांचा भरणा
अकोला जीएमसीकडून हाफकीनच्या देयकांचा भरणा करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोला जीएमसीचा पुरवठा विस्कळीत होणार नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.