सचिन राऊत /अकोला - स्वाइन फ्लूने गत तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात ४0४ जणांचा बळी घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाद्वारे या तीन महिन्यांत सुमारे चार लाखांवर संशयित रुग्णांचे ह्यस्वॉबह्ण व रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, यापैकी तब्बल चार हजार रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ मार्च महिन्यात सुमारे २६२ जणांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लू या घातक आणि भयंकर आजाराने जानेवारीमध्ये नागपूर, पुणे आणि पुणे ग्रामीण भागात प्रचंड थैमान माजवले. त्यानंतर तीन महिन्यांतच नाशिक, सोलापूर, चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिलत मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळले. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली; मात्र हा आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला वेळ लागला. स्वाइन फ्लूने जानेवारी महिन्यात राज्यात २१ जणांचा बळी गेला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण वाढले आणि १२१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. दोन महिन्यांच्या कालावधीत १४२ जणांचा मृत्यू झाल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू रोखण्यासाठी भरारी पथकं, प्रत्येक जिल्त हेल्पलाइन क्रमांक, प्रशिक्षण, शिबिर व कार्यशाळा घेतल्या; मात्र त्यानंतरही मार्च महिन्यात स्वाइन फ्लू संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात तब्बल १५0 जणांचा मृत्यू झाला, तर १६ मार्च ते ३१ मार्च या १५ दिवसांच्या कालावधीत आणखी ११२ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले. मार्च महिन्यातच सुमारे २६२ जनांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागही या आजारावर नियंत्रण मिळविण्यास हतबल झाला. स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढण्यास अवकाळी पाउस आणि गार पीटही कारणीभूत ठरल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
*चार लाख संशयितांचे नमुने
राज्यातील बहुतांश शहरांमध्ये स्वाइन फ्लू संशयित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा सुमारे चार लाखांवर असून, राज्या तील चार लाख संशयित रुग्णांचे स्वॉब व रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. यापैकी चार हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी ४0४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.