अकोला जिल्ह्यात ड्रोन मोजणीद्वारे मालमत्ता मोजणी सर्वेक्षण खापरवाडा येथे करण्यात आले. गावठाणाच्या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे १० मिनिटांत पूर्ण होऊन सर्वेक्षण नकाशे तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. येत्या चार महिन्यांत ८१० गावांतील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, यासाठी ग्रामविकास विभाग भूमी अभिलेख विभागाचे सहकार्य लाभणार आहे. यामुळे गावातील नाले, शेत रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमण व मालमत्तांची निश्चिती होणार आहे. गावठाणाच्या मालमत्तेचे अभिलेखे तयार होऊन सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार असल्याचेही ते म्हणाले
...असे आहेत ड्रोन मोजणीचे फायदे
गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे सर्वेक्षण होऊन, गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे, मिळकतधारकांना आपल्या मिळकतींचे सीमा व नेमके क्षेत्र माहीत होणार आहे, गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्तापत्रक (मिळकतपत्रिका) मिळणार आहे, मालमत्तापत्रक (मिळकतपत्रिका) म्हणजेच गावठाणतील घर जागेचा मालकीहक्काचा पुरावा असल्याने त्याआधारे कर्ज उपलब्ध होऊ शकेल, तसेच तारण म्हणून धारकाला जामीनदार म्हणून राहता येईल, मालमत्तेच्या मालकीहक्कासंबंधी अभिलेखे व नकाशे तयार झाल्याने आर्थिक पत उंचावेल, गावठाणातील जागेचे मालकी व हद्दीसंबंधी वाद, तंटे मिटवण्यासाठी गावठाण भूमापन अभिलेखे कायदेशीरदृष्ट्या प्रमाणित मानले जातात. त्यामुळे वाद/ तंटे संपुष्टात येतील, गावठाणातील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, गावठाणातील सार्वजनिक जागा, बखळ जागा, रस्ते, नाले यांचे नकाशे व अभिलेखे तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार आहे.