अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अकोला-मूर्तिजापूर महामार्गावर आंदोलन केले. कृषी विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एम.एससी. द्वितीय वर्षांचा विद्यार्थी शरद पोफळे याच्यावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात शरदच्या हात व मानेवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त झाले होते. महत्त्वाचे विविध बियाणे, कृषी यंत्राचे संशोधन करणार्या कृषी विद्यापीठात कोणतीच सुरक्षा नसल्याने या प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरील लोकांची वर्दळ वाढली आहे. अनेकांनी या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी केला आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाची सुरक्षा धोक्यात आली आहे. या कृषी विद्यापीठात संशोधन तर चालतेच शिवाय देश विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे आलेले आहेत. या मुला-मुलींच्या वसतिगृहासह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी येथे वसतिगृह आहे. पण सुरक्षा मात्र कुठेच नसल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दुपारी या महामार्गावर आंदोलन केले.या आंदोलनाची कृषी विद्यापीठाने तातडीने दखल घेतली. प्रशासनाने एक बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांंनी आंदोलन मागे घेतले. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. सहयोगी अधिष्ठाता,पदव्यूत्तर डॉ. दिलीप मानकर यांनी विद्यार्थ्यांची समजूत घातली असल्याचे सांगीतले. कुलसचिवांनी विद्यार्थ्यांंच्या मागण्या तातडीने मान्य केल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. यापुढे विद्यापीठात असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी कळवले आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 23, 2014 02:13 IST