लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : महामार्ग निर्मितीत अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन शेगाव येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी अकोल्याहून शेगावकडे कारने जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारस फाट्यावरील एका हॉटेलमध्ये राष्ट्रीय महामार्ग निर्मितीत अन्याय झालेल्या शेतकऱ्याशी बोलताना दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारस फाट्यावरील एका हॉटेलसमोर बााळापूर तालुक्यातील महामार्ग निर्मितीत भूसंपादनात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यास जाताना ठाकरे यांचा ताफा शेतकऱ्यानी अडविला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी नेते अॅड. मुरलीधर राऊत, आकाश दांदळे, संजय शेळके, राजू हिवरकर, लक्ष्मीनारायण श्रीमाळी, वाजीद इमरान, संतोष बिलबिले, मो. अबरार मो. मसुद आदींनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील मोबदल्याबाबत शेतकऱ्यांवर झालेला अन्यायाचा पाढा वाचून त्यांना न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. यावेळी उपरोक्त शेतकरी नेत्यांनी बाळापूर तालुक्यात भूसंपादनात गेलेल्या शेतीची माती व कापूस ठाकरे यांना सदिच्छा भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करणारे निवेदन दिले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी या मातीचे इमान घेऊन सांगतो, की कर्जमुक्तीसोबतच मी महामार्ग निर्मितीमध्ये अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. यावेळी बाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी!
By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST