अकोला : शहरात साफसफाईची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाने सफाई कर्मचार्यांची प्रभागनिहाय अदलाबदल केली. यामुळे साफसफाईची कामे मार्गी लागतील, ही नगरसेवकांची अपेक्षा फोल ठरली असून, काही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्यामुळे संतापलेल्या शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांनी मनपात ठिय्या दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. मनपाच्यावतीने शहरात दैनंदिन साफसफाई होणे गरजेचे असताना प्रभागांसह मुख्य रस्ते, बाजारपेठ, हॉटेल्स व रुग्णालय परिसरात घाण व कचर्याचे ढीग साचले आहेत. आस्थापनेवर ७४0 सफाई कर्मचारी व ४२ पडीत वॉर्डांंसाठी ६७0 पेक्षा जास्त खासगी सफाई कर्मचारी असतानादेखील अस्वच्छतेची समस्या कायम आहे. यावर उपाय म्हणून आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांची प्रभागात अदला-बदल करताच, काही भागात खर्या अर्थाने साफसफाईच्या कामाला वेग आला. मागील अनेक वर्षांंपासून बिळात लपून बसलेल्या सफाई कर्मचार्यांना प्रशासनाने कामाला लावले. मात्र अद्यापही काही सफाई कर्मचारी कामावर रुजू होत नसल्यामुळे सेना-भाजपच्या नगरसेवकांनी मनपाच्या आवारात ठिय्या दिला. यामध्ये विरोधी पक्षनेता हरीश आलीमचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक बाळ टाले, अजय शर्मा, अनहलक कुरेशी, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, सुरेश अंधारे, सुभाषराव म्हैसने, सोनू देशमुख, सागर शेगोकार यांचा सहभाग होता.आंदोलन स्थळी आमदार गोपीकिशन बाजोरिया दाखल झाले व त्यांनी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आंदोलन संपले.
शिवसेना-भाजपचा मनपात ठिय्या
By admin | Updated: August 23, 2014 02:12 IST