अकोला : आधीच अतिरिक्त शिक्षक असताना आणि चौकशी सुरू असताना, गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या सात शिक्षकांच्या नियमबाह्य जिल्हा बदल्या रद्द करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचा मुद्दा सभेत चांगलाच गाजला. जिल्ह्यात आधीच शिक्षक अतिरिक्त असताना आणि बिंदूनामावली मंजूर नसताना गेल्या दोन दिवसात सात शिक्षकांच्या जिल्हा बदल्या कशा करण्यात आल्या, अशी विचारणा सदस्य चंद्रशेखर पांडे, पुंडलिक अरबट व इतर सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना केली. जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावर, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शिक्षकांच्या बदल्या करण्यास सांगितले नसतानाही बदल्या का करण्यात आल्या, अशी विचारणा सदस्यांनी यावेळी केली.अखेर सदस्यांच्या मागणीनुसार नियमबाह्य करण्यात आलेल्या सात शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. सभेला उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार,समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे,दामोदर जगताप,शोभा शेळके, डॉ.हिंमत घाटोळ, पुंडलिक अरबट,गजानन उंबरकर, रामदास लांडे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी, जावेद इनामदार उपस्थित होते.
सात शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द
By admin | Updated: August 23, 2014 02:17 IST