लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चिवचिव बाजारातून एस. चांद कंपनी प्रकाशनाच्या नावावर पुस्तकांची छपाई करून ती परस्पर विक्री केल्याप्रकरणी अटक असलेल्या सात पुस्तक विक्रेत्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.नवी दिल्ली येथील एस. चांद या प्रकाशन कंपनीचे विविध प्रकारच्या शासकीय नोकरीसंदर्भातील पुस्तके आहेत; मात्र या कंपनीच्या नावावर बनावट पुस्तकांची छपाई करून चिवचिव बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याची माहिती पुस्तक प्रकाशकांना मिळाली. एस. चांद कंपनीचे राघव यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली. त्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दिल्ली येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चिवचिव बाजारातील पुस्तक विक्रेत्यांवर छापा घालून १ लाख ५४ हजार रुपये किमतीच्या पुस्तकांचा साठा जप्त केला आणि विजय बुक डेपोचे संचालक विजय भीमराव जाधव, अग्रवाल बुक स्टॉलचे संचालक हरीशकुमार भगवानदास अग्रवाल, हरणे बुक स्टॉलचे संचालक महेंद्र सुधाकर हरणे, श्री पुस्तक घरचे संचालक श्रीकांत चंद्रभान डाबरे, मराठा बुक्सचे संचालक गोपाळ प्रभाकर हरणे, चेतन बुक स्टॉलचे वासुदेव सांगोळे, श्री साई बुक्सचे संचालक पंकज वासुदेव सांगोळे यांना अटक केली. त्यांच्याकडे यासह बनावट पुस्तकांचा आणखी साठा जप्त केला. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सात पुस्तक विक्रेत्यांना गुरुवारपर्यंत कोठडी
By admin | Updated: May 31, 2017 01:34 IST