फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सर्वात माेठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजपचे ८० पैकी तब्बल ४८ नगरसेवक विजयी झाले हाेते. मनपात विराेधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या काॅंग्रेसचे १३ नगरसेवक असून त्यानंतर शिवसेनेचे आठ व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. २०१२ मधील निवडणुकीतही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाच नगरसेवक विजयी झाले हाेते. शहरात ठराविक प्रभागातूनच राष्ट्रवादीचे नगरसेवक विजयी हाेत असल्यामुळे पक्ष संघटनेचा विस्तार करण्याची गरज असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जाते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या विजय देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शहराची सूत्रे स्वीकारतील,असा कयास लावला जात हाेता. शहरात पक्षाची अत्यंत केविलवाणी स्थिती लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी महानगराध्यक्षपदाची जबाबदारी विजय देशमुख यांच्याकडे साेपवली. तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणात माेलाची भूमिका बजावण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्यानंतर देशमुख यांनी शहरात पक्ष बांधणीला सुरूवात केल्याचे दिसत आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या अकाेला पश्चिम विधानसभा मतदार संघात महानगराध्यक्ष देशमुख यांनी तरूणांच्या बैठकांचे सत्र सुरु केले आहे. बैठका,कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून आगामी मनपा निवडणुकीची पेरणी केली जात असल्याची दखल भाजपमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे.
काॅंंग्रेसने घेतली धास्ती
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत अकाेला पश्चिम मतदार संघातून राष्ट्रवादीने बलाढ्य भाजपसाेबत दाेन हात केले हाेते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पारड्यांत २५हजारपेक्षा अधिक मतांचे मतदान हाेते. २०१९ मध्ये हा मतदार संघ पुन्हा काॅंंग्रेसच्या वाटेला गेला. त्यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या २ हजार ३०० मतांच्या फरकाने विजय हाेऊन काॅंग्रेस उमेदवाराला ७२ हजारपेक्षा अधिक मते मिळाली हाेती. मनपा निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष विस्तार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खेळीची सर्वाधिक धास्ती काॅंंग्रेसने घेतल्याची चर्चा आहे.