अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण रुग्णालयात गत ६ दिवसांपासून लसीकरण ठप्प पडले आहे. नियोजनाअभावी लसीकरणासाठी लागलेल्या रांगेतील अनेक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्या लाटेत कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अकोट तालुका व शहरात लसीकरणावर शासनाने भर दिला आहे. दरम्यान, गत सहा दिवसांपासून अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण ठप्प पडले आहे. शहरातील दोन लसीकरण केंद्रसुध्दा मनुष्यबळाअभावी बंद आहेत. दुसऱ्या लाटेतील २० जणांच्या झालेल्या मृत्यूचे प्रमाण पाहता, लसीकरण करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असतानाही नियोजनाअभावी रांगा लागत आहेत. सद्यस्थितीतही दररोज रुग्ण ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत आहेत. तालुक्यात सध्या ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधे काही रुग्ण लस घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात गेले होते. या ठिकाणी कुठलेही सुरक्षित अंतर नसल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. अखेर लस तर मिळालीच नाही. परंतु काही रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तालुक्यातील ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना लसीकरणावर भर देणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा रामभरोसे सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर हा आदेश गंभीरतेने घेतला जात नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत पडणारी भर चिंताजनक आहे. अशातच लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
एका मिनिटाच्या लसीसाठी चार तास रांगेत
ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरवठा झाल्यानंतर नियोजन नसल्याने लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण आजारीही पडले आहेत. या ठिकाणी केवळ एक संगणक लावण्यात आले आहे. या संगणकावर पडताळणीकरिता चार तास लागत आहे. तर लस घेण्याकरिता मात्र एक मिनिट लागत आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा झाल्यानंतर शासनाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये याकरिता संगणक वाढवून या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था तसेच शहरात बंद केलेले लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.