लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पिंजर येथे सुरू असलेली शामकी माता प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविण्यात आले. त्याआधारे शासनाचे अनुदान, पूरक पोषण आहार, शालेय पोषण आहाराचा अपहार करण्यात आला, तसेच शिक्षक संच मान्यता वाढवून घेत शासनाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कारवाई न झाल्यास १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा डॉ. संजय भोपत चव्हाण यांनी शिक्षण सचिवांना निवेदनात दिला आहे. शामकी माता शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया मोहन पवार, मंडळाचे सचिव किसन रंगलाल पवार यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केली. त्यामध्ये २०१५-१६ या सत्रात वर्ग १ ते ४ मध्ये शाळा सरल डाटामध्ये ६० ते ७० विद्यार्थ्यांचे खोटे दाखले आॅनलाइन दाखविण्यात आले, तसेच त्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही दाखविण्यात आली. त्याआधारे शासनाचा पूरक आहार, शालेय पोषण आहार, शिक्षक संच मान्यता वाढविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, २०१२-१३ मध्ये वर्ग पहिलीच्या दाखल खारीज रजिस्टरनुसार १८ विद्यार्थी तत्कालीन मुख्याध्यापकांनी रद्द केले होते. तेच बोगस विद्यार्थी वर्गशिक्षिका छाया मोहन पवार यांनी सतत हजेरीपटावर दाखविले. त्यांचे पेपरही बनावट पद्धतीने घेण्यात आले. त्यांना २०१५-१६ मध्ये उत्तीर्ण करून आॅनलाइन गुणदान देण्यात आले. त्यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक प्रवीण चव्हाण यांना धमकावून संस्थापकांची पुतणी असलेल्या छाया पवार यांनी निकाल तक्त्यावर स्वाक्षरी घेतल्याचेही म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये विद्यार्थी खोटे असल्याचे स्पष्ट झाले, तसेच शालेय दस्तावेज अद्ययावत न ठेवल्याने मुख्याध्यापिका पवार यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे मुख्याध्यापिका पवार यांना निलंबित करा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, बनावट विद्यार्थ्यांच्या नावे विविध योजनांद्वारे शासनाचे लाटलेले अनुदान वसूल करा, संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करा, या मागणीसाठी १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा डॉ. संजय चव्हाण यांनी निवेदनात दिला आहे.
बोगस विद्यार्थ्यांच्या आधारे चालते शाळा
By admin | Updated: May 29, 2017 01:35 IST