अकोला : आज प्रत्येकाच्या घरात संगणकाने जागा मिळविली आहे. उन्हाळय़ाच्या सुट्या लागलेल्या असल्याने लहान मुले व युवा पिढी संगणकाच्या विश्वात रमलेली दिसून येते; मात्र तासन्तास संगणकासमोर बसून राहण्याने त्याचा विपरीत परिणाम लहान मुले व युवा वर्गाच्या आरोग्यावर होत असून, कॉम्प्युटरमुळे व्हिजन सिंड्रोमचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे घराघरात संगणक पोहोचला आहे. संगणक घरात असल्यामुळे बच्चे कंपनी त्यांच्या विश्वात रमू लागली आहे. युवा वर्ग व घरातील मोठी मंडळीदेखील यात रममाण होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शरीरास आवश्यक असलेल्या मैदानी खेळाकडे प्रत्येक जण पाठ फरवित असल्याचे दिसून येते. तासन्तास संगणकासमोर बसून गेम्स खेळणार्या बच्चे कंपनीला काटरुनच आता जवळचे साथीदार वाटू लागले आहेत. तर युवा पिढीदेखील फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्समध्ये डोके खुपसून बसलेली असतात. आजची टेक्नोसॅव्ही युवा पिढी त्याला सहज हाताळत आहे. मग काय, आपल्या आवडीचे गेम्स वा साईट्स सर्च करताना दोन-तीन तास कसे उलटून जातात, हेही त्यांना कळत नाही. संगणकाचा कामासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापर होत असल्याचे दिसून येते. अगदी तहान-भूक विसरून रममाण होताना नित्याची दिनर्चादेखील बाजूला सारली जाते. अधिक काळ स्क्रिनसमोर बसून राहण्याने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचा धोका वाढला असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिला आहे. ५ वर्षांंपासून ते १५ वर्षे वयाच्या मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, हे प्रमाण दिवसागणिक २0 टक्क्याने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकसारखे कॉम्प्युटरसमोर बसल्यामुळे डोळय़ांवर ताण पडून दृष्टी क्षमता कमी होऊ शकते, या पृष्ठभूमीवर पालकांना सावधानतेचा इशरादेखील देण्यात आला आहे.
** लक्षणे
संगणकावर एकटक बघितल्याने डोळय़ांवर ताण येतो. डोळे कोरडे पडतात. पापण्यांच्या हालचाली होत नाहीत. डोळय़ातून पाणी येते. डोळे लाल होणे, डोळय़ांना खाज सुटणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. परिणामी नेत्ररोग होण्याची अधिक संभावना बळावते. डोकेदुखीचादेखील त्रास होतो. केवळ मुलांनाच नव्हे, तर युवा पिढीला व मोठय़ा मंडळींनादेखील हा त्रास होतो.