कारंजा रम ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत अंदुरा परिसरातील १६ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील काही दिवसांपासून अंदुरा येथे विजेचा लपंडाव सुरू असून, कधी वारा तर कधी पाऊस जरी तासभर पडला तरी वीजपुरवठा रात्रभर खंडित करण्यात येतो, तर कधी वारा, पाऊस नसतानासुद्धा वीजपुरवठा रात्रभर खंडित केला जातो. एवढेच नव्हे दर तासाला वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे कधी वीजपुरवठा जास्त दाबाने तर कधी कमी दाबाने होत असल्याने घरातील विजेवर चालणाऱ्या वस्तू निकामी होत असून, नागरिकांना नाहक आर्थिक त्रास होत आहे.
विजेच्या लपंडावामुळे व्यवसाय बंद
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे विजेवर चालणारे व्यवसाय बंद करून ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून, परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, येत्या तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास कारंजा रम येथील वीज उपकेंद्र येथे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.