वाशिम: नांदेडवरून सिकंदराबादकडे धावणार्या पॅसेंजरने एका स्कूल बसला दिलेल्या धडकेत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तेलंगणामधील मेडक जिल्ह्यात घडली. चालकाच्या उतावीळपणातून रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात घडला. वाशिम शहरातील पुसद व हिंगोली मार्गावर असलेल्या रेल्वेक्रॉसिंगवरही वाहन चालकांचा हा आततायीपणा नित्याचा झाल्याचा दिसून येतो. या क्रॉसिंगवर रेल्वे विभागाने फाटक लावले असले तरी, त्याच्या खालून दुचाकीस्वार आपल्या दुचाकी काढतात. यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर स्वाभाविकच या मार्गावर धावणार्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, रेल्वेच्या वेळेत पुसद व हिंगोली मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील वाहतुकीची कोंडी वाढली आहे. गेट बंद असताना वाहनधारकांना नाहक ताटकळत उभे राहावे लागत असून, काही उतावीळ दुचाकीस्वार गेटखालून वाहने काढतात. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. गत सहा वर्षांपूर्वीपर्यंत अकोला- पूर्णा हा लोहमार्ग मिटरगेज होता. त्यामुळे या मार्गावर धावणार्या रेल्वेची संख्या कमी होती. तथापि, आजमितीला या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच या मार्गावर धावणार्या रेल्वेच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. तिरूपतीपर्यंतच्या गाड्या याच मार्गावरून धावत आहेत. शिवाय अकोला-हैद्रराबाद दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेसदेखील याच मार्गावरून सुरू आहे. भविष्यात गाड्या वाढण्याची शक्यता आहे.
रेल्वेची जीवघेणी ‘क्रॉसिंग’
By admin | Updated: July 26, 2014 22:06 IST