अकोला - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वेच्या रुळावरील ह्यपेंडॉल क्लिप्सह्ण चोरण्याचा तीन मद्यधुंद चोरट्यांचा डाव फसला. रेल्वे पोलिसांनी या तीनही चोरट्यांसह भंगार खरेदी करणार्यास अटक केली. त्यांना मंगळवारी भुसावळ येथील रेल्वेच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही सात फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ११३ किलोच्या लोखंडी क्लिप्स चोरी गेल्या असत्या, तर या ठिकाणी रेल्वेचा मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयानजीक असलेल्या मोर्णा नदी रेल्वे पुलावर दोन व्यक्ती संदिग्धावस्थेत फिरत असल्याचे रेल्वेच्या चाबीमॅनला आढळले. चाबीमॅनने दोघांनाही रेल्वे रुळावरून खाली उतरण्यास सांगितले; मात्र चाबीमॅन निघून जाताच रेल्वे रुळाच्या मधोमध असलेल्या सुमारे एक क्विंटल १३ किलोच्या लोखंडी पेंडॉल क्लिप्स या चोरट्यांनी काढण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना मिळताच त्यांनी रेल्वेचे चाबीमॅन आणि अधिकारी व कर्मचार्यांना सोबत घेउन रुळामधील लोखंडी पेंडॉल क्लिप्स काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या संजयनगर येथील रहिवासी शेख मुनीर शेख नासीर (३0) आणि बार्शिटाकळी येथील रहिवासी सुनील शिवचरण वानखडे. (४२) या दोघांना रंगेहाथ अटक केली; मात्र रेल्वे पुलाखाली उभा असलेला एक आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. चोरीचे साहित्य खरेदी करणारा लकडगंज येथील भंगार व्यावसायिक अब्दुल माजिद अब्दुल कादिर यालाही पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध पोलिसांनी रेल्वेच्या संपत्तीचे विद्रुपीकरण आणि अनधिकृत हक्क केल्याप्रकरणी कलम ३(अ) नुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. तीनही चोरट्यांना मंगळवारी भुसावळ येथील विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सदर चोरट्यांना जळगाव येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.
रेल्वेच्या ‘पेंडॉल क्लिप्स’ चोरण्याचा डाव फसला
By admin | Updated: January 28, 2015 01:04 IST