अकोला : पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानात बुधवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास झालेली पोलिसांची देखणी कवायत आणि शस्त्र प्रदर्शनातील विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी शहरातील शालेय विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. शानदार पोलीस कवायतीने तर विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळय़ांचे पारडे फिटले. शस्त्र प्रदर्शनाला शाळांच्या विद्यार्थ्यांंनी भेट देऊन शस्त्रांची माहिती जाणून घेतली. उत्सुकतेपोटी विद्यार्थ्यांनी शस्त्र हाताळून पाहिलीत. तसेच पोलीस कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांंना शस्त्रांसंबंधीची माहिती दिली. बंदूक, रिव्हॉल्वर, देशी व विदेशी बनावटीच्या गन, रायफल, काडतूस शस्त्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. पोलिस मैदानावरील शस्त्र प्रदर्शनात मुंगीलाल बाजोरिया विद्यालय, स्वावलंबी विद्यालय, जी.एस कॉन्व्हेंट, गुरुनानक कॉन्व्हेंट, होलीक्रॉस, कारमेल, बीआर हायस्कूलच्या विद्यार्थी व नागरिकांनी आधुनिक शस्त्रांसंबंधी माहिती जाणून घेतली. परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वात शानदार पोलीस कवायत करण्यात आली. पोलिसांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मानवंदना दिली. कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक मीणा यांनी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना साथ द्यावी आणि महिला भगिनींनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध निर्भीडपणे पुढे आले पाहिजे. न घाबरता पोलिसांना माहिती दिली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक प्रमोद काळे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस ठाण्यांचे ठाणेदार उपस्थित होते.
पोलीस कवायत, शस्त्रे ठरली विद्यार्थ्यांसाठी आकर्षण
By admin | Updated: January 8, 2015 00:41 IST