संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडने तूर खरेदीची मुदत वाढविली असली, तरी शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळण्यास वेळ लागणार आहे. त्याचा गैरफायदा अकोल्यातील काही व्यापारी घेत, तुरीच्या पिकाची नगद रक्कम हवी असलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी केली जात असल्याचे धक्कादायक वृत्त हाती लागले आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत. इतर डाळ मिलमध्ये चणा, उडीद, मूग आदी डाळी तयार होतात. दरवर्षी अकोला परिसरातील तुरीचा साठा अकोल्यातील व्यापारी आणि डाळ मिल उद्योजक करीत असतात. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला लुटण्याचे काम सुरू आहे. साडेतीन हजारांच्या पडक्या भावाने तुरीची छुप्या मार्गे खरेदी होत आहे. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.पेरा कमी झाला तरच भाव वाढतूर डाळ महागल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले गेले; पण पीक भरपूर आल्याने भाव घसरले. त्यामुळे अप्रत्यक्ष तूर डाळीचे भावही कमी झाले. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील तुरीचा पेरा कमी होण्याचे संकेत आहेत. जर पेरा कमी झाला, तरच तुरीचे भाव वाढणार, अन्यथा तुरीला भाव मिळणार नाही, असेही बोलले जात आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या परिसरातही तुरीचा पेरा वाढला. त्यामुळे तूर आणि तूर डाळीची मागणी घसरली. त्याला हेदेखील दुसरे कारण आहे.मागील तुरीचा साठा तसाचअकोल्यातील शेकडो डाळ मिल उद्योजकांकडे मागील वर्षांचा चढ्याभावाने घेतलेला तूरडाळीचा साठा तसाच आहे. तुरीचे भाव वाढतील, या आशेने गुंतवणूक झाली होती; मात्र तुरीचे भाव गडगडल्याने आता मागील तुरीचा साठाच काढणे व्यापाऱ्यांना कठीण झाले आहे. एमआयडीसीत लाखो गोणी तुरीचा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट
By admin | Updated: May 29, 2017 01:32 IST