लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरातील पेट्रोल-डीझेलचे दर उद्या शुक्रवार, १६ जूनपासून दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनातर्फे घेतला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी सर्वत्र जाणवणार असून, अकोल्यातील पेट्रोल पंपांवर वेगवेगळ््या ठिकाणी वेगळे दर दिसण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जाते की विरोध, हे शुक्रवारी समोर येईल. मात्र याचा जबर फटका पेट्रोल पंप संचालकांना बसण्याचे संकेत आहेत.देशभरातील पेट्रोल-डीझेलचे दर येत्या १६ जूनपासून दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्याला विरोध करण्यासाठी देशभरातील पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला होता; मात्र दिल्लीत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत असोसिएशनची बैठक यशस्वी ठरल्याने आता प्रस्तावित आंदोलन मागे घेतले गेले आहे. दरम्यान, यासंदर्भात आॅइल कंपनीनेदेखील बैठक बोलविली होती. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीत पेट्रोल पंपांचे भाव दररोज बदलण्याचा निर्णय फायनल असल्याचे सांगितल्यानंतर आॅइल कंपनीने नमती घेतली. त्यानंतर येथे सविस्तर चर्चा झाली. तिन्ही आॅइल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने येथे उपस्थित होते. दर बदलामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा भुर्दंड डिलर सोसणार नाही. दर बदल सकाळी करण्यात येईल. दर बदल डिलर करणार नाही. कंपनीतर्फे देशभरातील पेट्रोल पंपांचे आॅटोमेशन करण्यात येईल. कुशल कर्मचाऱ्यांचा खर्च अतिरिक्त द्यावा, मालाचा ताबा (आर्थिक) नोझल सेलने विक्री होईपर्यंत कंपनीने घ्यावा, अशी बोलणी दिल्लीच्या बैठकीत झाल्याची माहिती संघटनेचे प्रमुख उदय लोध यांनी दिली आहे. आॅटोमेशन नसलेल्या पंपधारकांसाठी डोकेदुखीअकोल्यातील ज्या पेट्रोल पंपाचे आॅटोमेशन झालेले नाही, त्या पेट्रोल पंप संचालकास दररोज पेट्रोलचे रात्रीचे दर आणि सकाळचे दर पाहून सकाळी सहा वाजताच्या आत मॅन्युअली पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये दर टाकावे लागतील. त्यानंतर पेट्रोलची विक्री करावी लागेल. अकोला जिल्ह्यातील ६२ पैकी ३० पेट्रोल पंपाचे अजूनही आॅटोमेशन झालेले नाही. यामध्ये शहरातील सहा पेट्रोल पंपांचा समावेश आहे. तिन्ही आॅइल कंपनीने समस्त पेट्रोल पंपाचे आॅटोमेशन करून देण्याचे जाहीर केले असले, तरी या प्रक्रियेला अजून आठ ते सहा महिने लागणार असल्याचे बोलले जाते. आॅटोमेशन म्हणजे काय... जे पेट्रोल पंप अत्याधुनिक नेटवर्कने जोडलेले आहे, ज्यांची संपूर्ण माहिती कंपनी आणि पेट्रोल पंप संचालकांना आॅनलाइन मिळते. पेट्रोल पंपांचे दर बदलही ज्या पेट्रोल पंपात आॅटोमॅटिक बदलतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानानंतर पेट्रोल पंपाचे आॅटोमेशन शक्य आहे. पेट्रोल पंपाचे आॅटोमेशन झाल्यास पेट्रोलचा साठा, बिलिंग, ग्राहकास एसएमएस आणि आॅनलाइन प्रक्रिया यामध्ये स्पष्ट दिसेल. पेट्रोलचे दर बदल करण्यासाठी पेट्रोल पंप संचालकास काही करायची आवश्यकता राहणार नाही; मात्र आॅटोमेशनसाठी आॅइल कंपनीला मोठा खर्च या प्रक्रियेवर करावा लागणार आहे.
आजपासून दररोज बदलतील पेट्रोलचे भाव!
By admin | Updated: June 16, 2017 00:30 IST