अकोला: शेतकर्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळावे, याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत विदर्भातील शेतकर्यांना उच्च तंत्रज्ञानाची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे. बोगस बियाण्यांना आळा बसावा, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. अलीकडे देशात बियाणे टंचाई आणि बोगस बियाण्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकर्यांना प्रत्येक हंगामात सोसावा लागतो. यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड बियाणे टंचाई निर्माण झाली होती. प्रमाणित सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने विदर्भातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे वांझ निघाले, या वांझ बियाण्याची नुकसान भरपाई शेकडो शेतकर्यांना अद्या पही मिळाली नाही. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्या आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. मुख्यत्वे विदर्भातील शेतकर्यांच्या माथी बोगस, वांझ बियाणे मारले जात असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्यांनी उच्च प्रतिचे बियाणे निर्माण करावे, यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत शंभरच्यावर शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, येत्या हंगामात या शेतकर्यांकडून उच्च प्रतिचे बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे अनेक वाण विकसित केले आहेत. यात काबुली काक-२, तूर आशा, गहू, उडीद, गुलाबी, करडी अशा शेकडो वाणांचा समावेश आहे; तथापि जोपर्यंत हे वाण शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंंत त्या वाणांचे तंत्रज्ञान आणि उपयोगिता निश्चित होऊ शकणार नाही. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाचे बियाणे वापरावे आणि या बियाण्यांचे बीजोत्पादन करण्यावर भर देण्यात येत आहे. बीजोत्पादन तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज असून, बीजोत्पादन कर ताना शेतकर्यांना येणार्या अडचणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सोडविल्या जात आहेत. शेतकर्यांनी याबाबतच्या तांत्रिक बाबी समजून घेण्याची गरज असल्याचे कृषीविद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ.डी.टी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
आता शेतकरीच करतील बीजोत्पादन!
By admin | Updated: November 16, 2014 01:09 IST