अकोला : शहरातील अनधिकृत बांधकामे, ठिकठिकाणी होणारे अतिक्रमण आदी प्रकाराला चाप लावण्यासाठी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रभागनिहाय बिट निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने झोननिहाय एकूण ७३ कर्मचार्यांना बिट निरीक्षक पदावर कार्यरत होण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले. शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम, फेरीवाल्यांसह लघू व्यावसायिकांच्या अतिक्रमणात वाढ होत आहे. रस्त्यालगत दुकाने थाटल्या जात असल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. शिवाय नगर रचना विभागाच्या नियमांना ठेंगा दाखवत अनधिकृत बांधकामं होत आहेत. या सर्व परिस्थितीवर अंकुश ठेवण्यासाठी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मनपाच्या इतिहासात प्रथमच प्रभागनिहाय बिट निरीक्षकांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेतला आहे. बिट निरीक्षक संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांना प्रभागातील इमारतींचे बांधकाम, फेरीवाल्यांसह लघू व्यावसायिकांनी थाटलेल्या अतिक्रमणाची इत्थंभूत कागदोपत्री माहिती देतील. शिवाय, अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी नियमित गस्त घालण्याचे आदेशात नमूद केले आहे. संबंधित प्रभागातील बांधकाम करणार्या व्यावसायिकाचे नाव, पत्ता, बांधकामाचे वर्णन, बांधकामधारकाचा मालकी हक्क आदी कागदपत्रांची तपासणी करण्याचा अधिकार बिट निरीक्षकांना देण्यात आला. यासंदर्भातील इत्थंभूत अहवाल लेखी स्वरूपात क्षेत्रीय अधिकार्यांना सादर करणे बंधनकारक राहील. बिट निरीक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी नगर रचना विभाग व उपायुक्तांना अहवाल सादर करतील.
आता प्रभागनिहाय बिट निरीक्षकांच्या नियुक्त्या
By admin | Updated: May 31, 2014 01:10 IST