अकोला : महापालिकेत आस्थापनेवर असलेल्या आठ सफाई कर्मचार्यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले. क्षेत्रीय कार्यालयात सेवा बजावल्यानंतर खासगी रुग्णालयातसुध्दा कामकाज करीत असल्याचा ठपका सफाई कर्मचार्यांवर ठेवण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.फारूख शेख यांच्या अहवालानुसार, २१ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. महापालिकेत स्वच्छता विभागात कार्यरत आस्थापनेवरील अनेक सफाई कर्मचार्यांची विविध विभागात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. यामध्ये अनेक कर्मचारी चपराशी, लिपिक म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता निर्माण व्हावी, नागरिकांच्या समस्या त्वरित निकाली निघण्यासाठी प्रशासनाने चार क्षेत्रीय कार्यालयांचे गठन केले. या कार्यालयांमध्ये चपराशी पदावर कार्यरत सफाई कर्मचारी मनपाचे कामकाज आटोपल्यावर खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत असल्याची माहिती प्रशासनासमोर आली. पूर्व झोनमधील विनोद प्रभू फुटाणे, भारत अर्जुन सारकर, विजय निनोरे, पश्चिम झोनमधील करण देवीदास अडाले, मनोज बोयत, लता किशोर नेवाटे, शक्ती घनश्याम गोहर, दक्षिण झोनमध्ये कार्यरत भोला पन्ना आदी आठ सफाई कर्मचारी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची बाब समोर आली. तशा स्वरूपाचा अहवाल मनपाचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख यांनी प्रशासनाकडे सादर केला. त्यानुषंगाने आठ कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
महापालिकेचे आठ सफाई कर्मचारी निलंबित
By admin | Updated: July 22, 2014 00:42 IST