अकोला : खारपाणपट्ट्यात आरोग्यासह शेतीच्या अनेक समस्या आहेत. जमिनीतील पाणी खारे असल्यामुळे विहिरींद्वारे सिंचन करता येत नाही. परिणामी शेतकर्यांना वरच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. या भागात अत्यंत कमी पाण्यात चांगले उत्पादन होते. मात्र आवश्यकता असताना पिकांना एकदा पाणी जरी मिळाले नाही तर उत्पादनात घट येते व शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो. त्यामुळे या भागातील शेतीचे अर्थकारण सुधारण्याकरिता प्रत्येक शेतामध्ये शेततळे व पावसाचे व्यवस्थापन हा प्रभावी उपाय असल्याचा सूर ह्यखारपाणपट्टा समस्या व उपायह्ण या विषयावर आयोजित लोकमतच्या परिचर्चेतून निघाला. परिचर्चेला माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, काँग्रेस किसान मजदूर सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधक डॉ. सुभाष टाले, शेतकरी चळवळीतील नेते उदय देशमुख यांची उपस्थिती होती. सर्वच वक्त्यांनी खारपाणपट्टयाच्या विकासा संदर्भात शासनाने गंभीर होण्याचे सुचविले. कृषी विद्यापीठाचे जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्या मतानुसार योग्य पद्धतीने पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन झाल्यास खारपाणपट्टय़ातील शेती जिवंत राहील. सांडवे नसल्याने पावसाच्या पाण्यासोबत काळी माती वाहून जाते.त्यासाठी कास्तकारांनी शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा. उतारावरील भागात कंटूर पद्धतीने शेती करावी. खारपाणपट्टय़ात जास्तीत जास्त शेततळे निर्माण करण्यासाठी शासनातर्फे युद्ध स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. शिवकालीन तलावांचेदेखील संवर्धन करण्याची गरज आहे. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व स्प्रिकलर पद्धतीचा वापर करावा. जिल्हा कृषि अधिक्षक प्रमोद लहाळे यांच्या मतानुसार सिंचनाचा प्रश्न फार गंभीर असल्यामुळे खारपानपट्टय़ातील शेतकर्यांनी विदर्भ सिंचन प्रकल्पांतर्गत शेततळे तयार करून घ्यावेत. दरवर्षी पाऊस किती पडेल याचा नेम नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस उशिरा आणि अल्प प्रमाणात झाला आहे. अजूनही खारपाणपट्टय़ातील शेतकरी करडी, जवस, हरभरा, रब्बी ज्वारी, सुर्यफूल, बाजरी आदी पीक घेऊ शकतात. यामुळे चार्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. अलीकडच्या काळात वेळेवर मजूर मिळणे कठीण झाले आहे. तसेच वन्य प्राण्यांचादेखील त्रास वाढल्याने कास्तकारांना कडधान्याची शेती करणे शक्य होत नाही. तर माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या मतानुसार खारपाणपट्टय़ात हगणदारीमुक्ती योजनेप्रमाणे शेततळय़ांची योजना अनिवार्य करावयास हवी. संपूर्ण राज्याला लागणार्या धान्याचे उत्पादन करण्याची क्षमता खारपाणपट्टय़ात असून, यासाठी व्हाटसेव हा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारदेखील खारपाणपट्टय़ाला मिळाला आहे. मात्र, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे खारपाणपट्टय़ाचा अद्याप विकास झालेला नाही. अकोला, जमिनीतील अतिक्षारामुळे अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्हय़ातील सुमारे ८७५ हेक्टर जमीन खारपाणपट्टा म्हणून ओळखली जाते. जमिनीतील पाण्यात अतिक्षार असल्यामुळे त्याचा पेरणीसाठी उपयोग होऊ शकत नाही. या क्षेत्रात पाण्याचा उपसा केला जात नसल्याने दरवर्षी खारपाणपट्टय़ाचे क्षेत्रात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
खारपाणपट्टय़ासाठी योग्य नियोजनच गरज
By admin | Updated: August 14, 2014 02:03 IST