अकोला : प्रत्येक युगाचा आपला एक धर्म आहे. कलियुगाचा धर्म नामसंकीर्तन हाच आहे. परमेश्वराचे नामसंकीर्तन केले तर अनंत पापाच्या राशी नासल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मनुष्याने नामसंकीर्तनाला महत्त्व दिले पाहिजे. नामसंकीर्तनातुनच मनुष्याचा उद्धार आहे, असे मत नागपूर येथील ह.भ.प. मुकुंदबुवा देवरस यांनी गुरुवारी अकोल्यात व्यक्त केले. श्री ब्रह्मचैतन्य धार्मिक सेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित नाईकवाडे कीर्तन महाविद्यालयाच्या वतीने व प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित नारदीय कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना मुकुंदबुवा देवरस बोलत होते. देवरस यांनी निरुपनासाठी संत तुकारामांचा ह्यनाम संकीर्तन साधन पै सोपे, फिटतील पापे जन्मांतरीचेह्ण हा अभंग घेतला. नामसंकीर्तनचे महत्त्व सांगताना बुवांनी अनेक दृष्टांत दिले. भक्तीचे जे नवप्रकार आहेत त्यात नाम हे सर्वात सुलभ साधन आहे. नामाचा महिमा संतांनी देखील गायिला आहे. ईश्वराची प्राप्ती करायची असेल, तर नामासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. कलियुगात नामच एकमेव असे साधन आहे, जे मनुष्याला या संसारातून तारून नेईल. म्हणूनच उठता-बसता, जेवताना-झोपतांना प्रभूचे नामसंकीर्तन केले पाहिजे, असे मुकुंदबुवा यांनी सांगितले. याप्रसंगी भाऊसाहेब नाईकवाडे यांच्या हस्ते बुवांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनात संवादिनीवर श्रीकिसन जयस्वाल, तबल्यावर मनोज जहागिरदार यांनी तर टाळाची साथ धनश्री मुळावकर यांनी दिली. संचालन वानखडे यांनी केले. शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी नारदीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे.
नामसंकीतर्नच मनुष्याचे उद्धारक
By admin | Updated: November 14, 2014 00:47 IST