बुलडाणा : अन्न पदार्थांसह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ त्वरित ओळखण्यासाठी राज्यात लवकरच मोबाइल प्रयोगशाळा सुरू केली होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, या प्रयोगशाळेमुळे भेसळखोरांवर 'वॉच' ठेवणे शक्य होणार आहे. मुंबई, ठाण्यासाठी १, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागासाठी २ आणि अमरावती, नागपूरसाठी १ अशा ४ मोबाइल व्हॅन उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्सवांच्या काळातच अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होत असल्याचे अनेक चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे. ही भेसळ रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध प्रयोगशाळांनी अन्नपदार्थांचे २ लाख ७४ हजार ६६२ नमुने गत सहा वर्षांमध्ये तपासले. त्यापैकी १४ हजार ६६१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे. या वर्षी जुलैच्या अखेरीस १९ हजार ७२ अन्न नमुने तपासण्यात आले. यामध्ये १0३१पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये दूध, मिठाई, गुटखा, धान्य, किराणा सामान, चायनिज फूड, साखर आणि फळांच्या नमुन्यांचा समावेश होता. अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा, शासकीय संस्था तसेच सार्वजनिक आणि खासगी संस्थामार्फत संकलित करून राज्यातील १५ सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधून यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अन्न पदार्थांमध्ये भेसळ झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
भेसळ रोखण्यासाठी मोबाइल प्रयोगशाळा!
By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST