अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व चर्चासत्राला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कडाक्याच्या थंडीमध्ये दुसर्या दिवशी राज्यातील तसेच परप्रातांतील शेतकर्यांचा ओघ कायम होता. शेतकर्यांसोबतच स्थानिक नागरिक, महिला व शाळकरी मुलांची गर्दी प्रदर्शनस्थळी होती. कृषी विद्यापीठाचे विविध संशोधन, तंत्रज्ञान दालनात शेतकर्यांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्यानविद्या विभागामार्फत संत्री, बिनाबियाची संत्री, कागदी लिंबाच्या बिया व काटा नसलेले वाण, हळद, अकोला सफेद कांदा प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. वनस्पतिरोगशास्त्र विभागातर्फे सर्वच पिके, फळझाडावरील कीड, रोग उपचार पद्धती याबाबत माहिती शेतकर्यांनी जाणून घेतली. कोरडवाहू कपाशीचे उत्पादन वाढविणे यासारख्या सोप्या व कमी खर्चीक तंत्रज्ञानाबद्दलची शास्त्रोक्त माहिती येथे शेतकर्यांना देण्यात आली. तेलबिया संशोधन विभागातर्फे तेलबिया पिकांच्या विविध वाणांचे नमुने, किडी, रोगांची माहिती शेतकरी जाणून घेत आहेत. कडधान्य विभागातर्फे उडीद पिकाचे पीडीकेव्ही बोल्ड वाण, मूग, ग्रीन गोल्ड, पीकेव्ही तारा तूर, पीकेव्ही हरिता हरभरा, पीकेव्ही काक-४ हरभरा तसेच कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन विभागातर्फे नुकतेच प्रसारित करण्यात आलेले एकेडब्ल्यू -४२१0-६ वाण या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या वाणात लोह आणि झिंक घटकाचे प्रमाण अधिक असून, उशिरा पेरणीकरिता उपयुक्त असलेल्या या वाणाप्रति शेतकर्यांची उत्सुकता होती. वाशिम-१४७२ या वाणासह गव्हाच्या इतरही वाणाची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकर्यांनी गर्दी केली होती. यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राने कुक्कुटपालनाविषयी शेतकर्यांना माहिती दिली. बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्र प्रसाराद्वारे निर्मित शेतकर्यांच्या शेतावरील फळे,भाजीपाला व मसाला पिकांचे ४५ नमुने येथे सजावट करू न ठेवण्यात आले आहे. शेतकर्यांनी या तंत्रज्ञानाची माहिती अवगत केली.
लाखो शेतक-यांनी जाणून घेतले कृषी तंत्रज्ञान!
By admin | Updated: December 29, 2015 02:21 IST