अकोला: लहान उमरीत एका लहानशा खोलीत राहून, लोकांच्या घरी धुणी-भांडी घासून बारावीत उत्कृष्ट यश संपादन करणार्या मनीषा वैद्यची शिक्षण घेऊन मोठं होण्याची मनीषा पूर्ण झाली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी मनीषाला दत्तक घेतले असून, तिचा शिक्षणाचा, राहण्याचा व जेवणाचाही खर्च करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. लहान उमरीतील अष्टविनायकनगरात एका आठ बाय आठच्या भाड्याच्या खोलीत मनीषा पाच जणांच्या कुटुंबासह राहते. वडील रामदास वैद्य वेल्डिंगच्या दुकानात मजुरी करतात, तर आई लक्ष्मीबाई लग्नकार्यात किंवा शुभप्रसंगी पोळ्या लाटण्याचे काम करते. मनीषा स्वत: दुसर्यांच्या घरी धुणी-भांडे करून शिक्षण घेत आहे. कुटुंबाला कोणतीच शैक्षणिक पृष्ठभूमी नसताना, जागृती महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मनीषाने बारावीत ६३.५३ टक्के गुण मिळविले. शिकवणीचा खर्च परवडत नसल्याने शाळेतीलच अभ्यासावर तिने लक्ष केंद्रित केले होते. अभ्यासाला दिवसा वेळ मिळत नसल्याने, कुटुंबातील सदस्य झोपले की रात्री एका कोपर्यात बसून ती अभ्यास करायची. शिक्षणासाठी तिची ही धडपड तिची अशिक्षित आई पाहायची; तिचा जीव तीळतीळ तुटायचा. त्यामुळे आईने मनीषाला जमेल तेवढी साथ द्यायची. कधी-कधी तिच्यावरची धुणी-भांडी करायची. मनीषाच्या कुटुंबीयांच्या या मेहनतीचे चीज झाले. पोरीच्या धडपडीला आलेलं यश पाहून, तिचे आई-वडिल भारावून गेले. श्री शिवाजी महाविद्यालयाने मनिषाला दत्तक घेतल्यानंतर तिच्या आईला आनंदाश्रू आवरले नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या मार्गदर्शनात प्रा. कोकाटे, प्रा. मोहन खडसे, प्रा. आनंदा काळे यांनी तिचे कौतुक केले. शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचे पत्र त्यांनी मनीषाला दिले.
मनीषाची ‘मनीषा’ अखेर पूर्ण!
By admin | Updated: June 4, 2014 01:38 IST