आकोट: मध्य प्रदेशातून कत्तलीसाठी अवैधरीत्या आणलेली गुरे कोंबून आकोटमार्गे अकोल्याकडे जाण्याच्या बेतात असलेला एक ट्रक आकोट पोलिसांनी रविवार, २७ जुलै रोजी पहाटे पकडून ४३ गुरांना जीवदान दिले. यावेळी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रक, स्कॉर्पीओ गाडी व गुरे असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आकोट न्यायालयाने आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवापूर येथून हरीसाल मार्गे अकोल्याकडे एका ट्रकमध्ये अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिस उपनिरीक्षक संजय कोरचे यांनी आज पहाटे चार वाजता सदर ट्रक रोखला; परंतु ट्रकचालकाने थांबण्याऐवजी ट्रक जोरात दामटला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून देवरी फाट्याजवळ ट्रक पकडला व पाच जणांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये २२ गायी, २१ बैल जिवंत व ३ मृत बैल आढळून आले. ही वार्ता पसरताच सामाजिक कार्यकर्ते दिलीप बोचे, बाळासाहेब इंगळे, दादाराव सोळंके, बाळू होले, जयप्रकाश पांडे तथा गोरक्षणचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळ गाठले व त्यांनी गुरांना चारापाणी देऊन त्यांची सुश्रूषा केली. डॉ. शरद पालखडे, डॉ. मिश्रा, डॉ. वानखडे, डॉ. घावट यांनी गुरांवर उपचार केल्यानंतर सदर गुरे गोरक्षणच्या ताब्यात देण्यात आली. गुरांची अमानुषपणे वाहतूक करण्याच्या आरोपाखाली सद्दाम हुसेन जाकीर हुसेन, कैलास हिरालाल धुरे, अमजद खान अ. सत्तार, अल्ताफराजा सिताबखाँ, बाबूखान खातुखान (सर्व रा. मध्य प्रदेश) या पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२९ व प्राण्यांना निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९,११, (१) (ह) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. प्रेमानंद कात्रे करीत आहेत.
कत्तलीसाठी नेणार्या ४३ गुरांना जीवदान
By admin | Updated: July 28, 2014 01:55 IST