तेल्हारा (अकोला) - शहराच्या मध्यभागी असलेल्या तेल्हारा बस स्थानक ते मानकर चौक या रस्त्यावर असलेले पुरण किराणा दुकानात एका ५0 ते ५५ वर्षीय ठग्याने प्रवेश करून दुकान मालकाच्या हातातून ८ हजार रुपये दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी १0 च्या सुमारात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुकानातून पैसे घेऊन पोबारा करणारा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. तेल्हारा बस स्थानक रोडवर पुरण सत्यनारायण अग्रवाल यांचे किराणा दुकान आहे. आज सकाळी १0 वाजता पुरण अग्रवाल हे दुकान उघडून दुकानात बसलेले होते. तेवढय़ात ५0 ते ५५ वर्षीय पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व चष्मा घातलेला एक अनोळखी इसम दुकानात आला. अगरबत्ती पुडा द्या व देवीच्या पेटीत टाकण्यासाठी ५00 रुपयांची चिल्लरसुद्धा मागितली. त्यानुसार दुकानदाराने चिल्लर देण्यासाठी नोटांचे बंडल काढले असता त्याने मला ही नोट नको दुसरी द्या, तसेच दुसरी पण नको तिसरी द्या अशाप्रकारे हेराफेरीचे प्रकार सुरू केले व दुकानदारांच्या हातातील नोटा हिसकावून बिना क्रमांकाची मोटारसायकल घेऊन उभा असलेला त्याचा दुसरा साथीदाराच्या गाडीवर बसून त्याने तेथून पोबारा केला. दुकानदार पुरण अग्रवाल बाजूचा दुकानदार गोपाल गावंडे यांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
भरदिवसा किराणा दुकानदारास लुटले!
By admin | Updated: November 30, 2014 00:51 IST