विदर्भात निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळानुसार, विदर्भात नागपूर, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि अकाेला या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रक्तगटाचा साठा काही प्रमाणात उपलब्ध असला, तरी निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा दिसून येत आहे. चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातही निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा दिसून येत आहे. तसेच नागपूरसह अमरावती, वर्धा आणि इतर काही जिल्ह्यांत प्लेटलेटस उपलब्ध आहेत.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील स्थिती चांगली
रक्त संकलनाच्या बाबतीत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील स्थितीत चांगली असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावरून दिसून येते. राज्यात पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा विदर्भाच्या तुलनेत जास्त दिसून येतो.
कोरोनाची भीती आहेच, त्यामुळे मोठे शिबिरांचे आयोजन होऊ शकत नाही. यासोबतच रक्तदात्यांमध्ये कोविडची भीती आहेच. परिणामी रक्तसंकलन प्रभावीत होत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रक्तदानाचे आवाहन केल्यावर डिसेंबरमध्ये काही प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात आल्याने परिस्थिती सुधारली होती; मात्र जानेवारी महिन्यात रक्तसंकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. अजय जुनगरे, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला