अकोला : खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आकोट तालुक्यातील पायल नामक एका पाच वर्षीय चिमुकलीला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पायल किडनीच्या आजाराचा धैर्याने सामना करीत असली, तरी गरिबीने पंख छाटले असून, परिणामी तिचे उपचारही थांबले आहेत. आकोट तालुक्यातील वरूळ जऊळखेड येथील सुधीर भाऊराव घनबहादूर हे शेतमजुरी करून आपले कुटुंब चालवितात. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. काबाडकष्ट करून सुधीर संसाराचा गाडा ओढत असताना, त्यांच्या जीवनात वर्षभरापूर्वी मोठे वादळ आले. त्यांच्या पायल या पाच वर्षीय मुलीला किडनीचा आजार जडला. त्यांनी सुरुवातीला आकोट येथे उपचार केले; मात्र आजार बरा होत नसल्याने त्यांनी अकोला व नागपूर येथे उपचार केले. उपचारानंतरही किडनीचा आजार वाढतच गेला. पायलची एक किडनी पूर्ण निकामी झाली असून, दुसर्या किडनीलाही आजार जडला आहे. सुधीर घनबहादूर हे शेतमजुरी करतात, तर अधून-मधून घराच्या रंगरंगोटीची कामे करतात. जवळ असलेले सर्व पैसे उपचारामध्ये खर्च झाले. एवढेच काय, पायलच्या उपचारासाठी त्यांनी गावातील जागाही विकली. आतापर्यंतच त्यांचा एक लाखावर खर्च उपचारामध्ये झाला आहे. याशिवाय सुधीर घनबहादूर यांचा जास्त वेळ रुग्णालयातच जात असल्याने, कुटुंबाच्या पालन-पोषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यांची पत्नी आजारी पायल आणि मुलांच्या देखभालीत व्यस्त असते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाची साधनंच या कुटुंबाकडे राहीली नाहीत. पायलची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, तिच्या शरीरावर सूज आली आहे. उपचारासाठी पैसेच नसल्याने, पायलच्या वडिलांनी तिला घरी ठेवले आहे. डॉक्टरांनी पायलच्या किडनीचे प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला दिला आहे. त्याकरिता चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. खिशात दमडीही नसल्यामुळे पायलचे वडील हताश झाले असून, मुलीचा जीव वाचविण्यासाठी ते केविलवाणी धडपड करीत आहेत. दानदात्यांनी पायलच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असून, खाते क्रमांक २९४५ आहे.
किडनी निकामी झालेल्या पायलची मृत्यूशी झुंज
By admin | Updated: June 14, 2014 23:30 IST