अकोला: आपल्या घर-परिवारापासून दूर देशाची सेवा व रक्षा करणार्या वीर जवानांच्या दीर्घायुष्य आणि सुखाच्या लक्षाविधी प्रार्थना सोबत आलेल्या सर्व राख्या सीमेवरील जवानांकडे पाठवून एका वेगळय़ा रूपात लोकमत सखी मंचच्या वतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. सखी मंचच्या सदस्यांनी सैनिक प्रशिक्षण केंद्रातील छात्रसेना अधिकारी व सैनिक बांधवांना राख्या बांधल्या. रविवारी १0 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास केंद्रातील लेफ्टनंट कर्नल (प्रशासन अधिकारी) मनीष सक्सेना यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सखींनी सैनिक बांधवांना राखी बांधून बहीण-भावाच्या अतूट बंधनाचे दर्शन घडविले. यावेळी मनीष सक्सेना म्हणाले, लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सैनिक प्रशिक्षण केंद्रातील सैनिकांना राख्या बांधल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. पंजाबमधून आलेले नायक सुभेदार, रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील सुभेदार मेजर व्ही. श्रीवास्तव, नेपाळ येथील सुभेदार जितेंद्र आले, हिमाचल प्रदेशातील ऑफिसर्स कॅडेड विकास, लुधियानाचे हवालदार जरनैलसिंग, अलाहाबादचे हवालदार अरुणकुमार यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रक्षाबंधन हा सण आपण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करीत असल्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे बहुतांश अधिकारी व सैनिक भारावून गेले होते. सर्वांंनी सखी मंचच्या या उपक्रमांची प्रशंसा करीत आभार व्यक्त केले. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणार्या सैनिकांना कर्तव्याच्या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांंनी तयार केलेल्या राख्या लोकमतच्या माध्यातून सैनिकांना पोहचविल्या. सखी मंचच्या सदस्यांनी या राख्या सैनिकांना बांधून विद्यार्थ्यांंमध्ये सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.
सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या
By admin | Updated: August 12, 2014 21:12 IST