अकोला : शेवटच्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने राजराजेश्वराला जलाभिषेक घातला जाणार आहे. त्यासाठी हजारो शिवभक्त कावड आणि पालखी घेऊन पूर्णा नदीचे जल आणण्यासाठी रविवारी दुपारनंतर गांधीग्रामकडे रवाना झालेत. मध्यरात्रीनंतर कावड-पालखीधारक जल घेऊन अकोल्याकडे रवाना झाल्यात. राज्यातील सर्वात मोठय़ा कावड-पालखी उत्सवाच्या आयोजनाची परंपरा श्री राजराजेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सन १९४३ पासून अखंड सुरू आहे. शहरात श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, २५ ऑगस्ट रोजी हा उत्सव होत आहे. श्री राजराजेश्वर मंदिरात सोमवारी जलाभिषेक केला जाईल. त्यासाठी गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पाणी कावडणे आणण्याची परंपरा आहे. त्यासाठी हजारो शिवभक्त कावड-पालखी घेऊन गांधीग्रामकडे रवाना झालेत. पालखी उत्सवात मानाची श्री राजराजेश्वर मंदिराची पालखी, माणकेश्वर मंदिर, श्री जागृतेश्वर मंदिर, पिंपळेश्वर मंदिर, रामभरोसे शिवभक्त मित्र मंडळाच्या पालखीसह १५0 पेक्षा जास्त पालख्या व अनेक कावडींचा समावेश आहे. या कावडी व पालख्या कडेकोड बंदोबस्तात मध्यरात्रीनंतर अकोल्याकडे रवाना झाल्यात. सोमवारी सकाळी ११ वाजतानंतर मानाची पालखी मंदिरात पोहोचेलच. *सर्वात मोठी कावड ४५१ भरण्यांची ४जुने शहरातील डाबकी रोडवासी शिवभक्त मंडळाची ४५१ भरण्यांची कावड ११0 फूट लांब, १६ फूट रुंद आहे. या कावडची उंची १५ फूट आहे. जुने शहरातील रेणुकानगरमधील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाची १0१ भरण्यांची कावड ४0 फूट लांब, १६ फूट रुंद व उंची १५ फूट असून, कावडवर जय बाभळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती व शिवलिंग उभारले आहे. हरिहरपेठस्थित हरिहर शिवभक्त मंडळाची ३0१ भरण्यांची कावड १00 फूट लांब, १२ फूट रुंदी व १४ फूट उंचीची असून, त्यावर बालाजी भगवानचा आकर्षक देखावा सादर केला आहे. कावडमध्ये ७00 शिवभक्तांचा सहभाग आहे. देशमुख फैलमधून रुद्र अवतार शिवभक्त मंडळाची ३0१ भरण्यांची कावड असून, कावडवर गजानन महाराज यांचा देखावा साकारण्यात आला आहे. कावडमध्ये १ हजार ८00 शिवभक्त सहभागी होतील. आकोट फैलस्थित आकोट फैलवासी शिवभक्त मंडळाची २५१ भरण्यांची कावड काढली जाणार आहे.
राजेश्वराला आज जलाभिषेक
By admin | Updated: August 25, 2014 03:14 IST